- मोहन पाटील
‘अजूनही जिद्द हरलो नाही… यश, अपयश किती याचा विचार केला नाही. कोणत्याही कारणाने नाउमेद झालो नाही आणि यापुढेही होणार नाही. अजूनही खूप झगडायचे आहे. शोषितांच्या विरोधातील माझी लढाई सुरुच राहणार आहे. ही लढाई सुरु असतानाच मला एखाद्या आंदोलनातच अथवा हाती माईक असतानाच मृत्यू यावा. माझ्या जीवनाचे सार्थक होईल..!,’ असे आत्मविश्वासाने सांगणाऱ्या ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील यांनी आज सोमवार, दि. १५ जुलै रोजी आयुष्याची नव्वदी उलटली. आपल्या आयुष्यातील सात दशके समाजासाठी खर्च करणाऱ्या सरांच्या कतृर्त्वाचा आणि दातृत्वाचा उलगडा कोणालाच होणार नाही. असा ‘बापमाणूस’ नव्वदी पूर्ण झाल्यानंतरही अंतिम श्वासापर्यंत वंचितासाठीच लढायचे म्हणत आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वंचितांच्या हक्कासाठीची कोणतीही लढाई असो तेथे एन. डी. सर नाहीत, असे कधी घडलेच नाही. अंनिस चळवळ, कोल्हापूर टोलनाका, सेझ आंदोलन, शिक्षण खासगीकरण, शेतकरी आत्महत्या, दुष्काळ, खाऊजा, एनरॉन विरोध आदी आंदोलनाचे नेतृत्व त्यांच्याकडेच राहिले. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील ढवळी येथे जन्मलेल्या डॉ. एन. डी. पाटील यांचा आत्तापर्यंतचा वंचितांसाठीच्या लढाईचा सात दशकांचा प्रवास कोणत्याही परिघात बसणारा नाही. सर्व सुखे पायाशी लोळत असतानाही आयुष्यभर सर ‘नाही रे’ वर्गाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. शेतकरी कामगार पक्षाशी आयुष्यभराची बांधिलकी, आमदार म्हणून मिळणारी पेन्शन आणि उभे आयुष्य समाजासाठी खर्च करणारा हा ‘बापमाणूस’ सामाजिक चळवळींसाठी ‘हिमालय’ आहे. आपल्या कवेत त्यांनी लाखो वंचितांची दुखे सामावून घेतली आणि त्यांना त्यावर मात कशी करायची याचे बळ दिले. त्यांच्यातील लढवय्या माणूस जागा केला आणि त्यांच्या प्रश्नांची जाण करुन दिली. अशी माणसे भविष्यात कधी होतील की नाही, हे माहित नाही.
एन. डी. सरांविषयी जेवढे बोलावे तेवढे कमी आहे. ‘नाही रे’ वर्गाच्या संरक्षणासाठी लढे उभारत असताना कोणी आपला माणूस दुखावला म्हणून कधी मागे हटले नाही. वेळप्रसंगी आपले मेहुणे शरद पवारांवरही टीकास्र सोडले. ‘सर, तुम्ही अनेकदा पवारांच्यावर अगदी सडकून टीका करता. त्याच्या बातम्याही येतात. मात्र, ज्यावेळी तुमची आणि त्यांची भेट होते. त्यावेळी तुमच्या आरोपांच्या अनुषंगाने कधी पवारसाहेब प्रतिक्रिया देतात का..?,’ असे विचारले तर सर अगदी दिलखुलास हसले. ‘हे बघ; मी काही फार कोणाला घाबरत नाही. मी रोज रात्री सुखाने झोपतो कारण दुसऱ्या दिवशी माझ्याविषयी वर्तमानपत्रात काहीतरी भयंकर असे छापून येणार आहे, असा प्रसंग माझ्या आयुष्यात घडलाही नाही आणि घडतही नाही. त्यांच्यावर मी असे का बोलतो. याचा विचार त्यांनी करावा आणि मला असे बोलू लागू नये म्हणून त्यांनी प्रयत्न करावेत,’ असे त्यांनी अगदी हसतच सांगितले होते.
दहा-बारा वर्षांपूर्वी सरांच्यावर एक मोठी अन् अवघड अशी गंभीर स्वरुपाची शस्त्रक्रिया होणार असल्याचे समजल्यानंतर त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणारा कार्यकर्ता हेलावून गेला. अस्वस्थ झाला. काहींनी सरांशी संपर्क साधत मुंबईला येणार असल्याचे सांगितले. शस्त्रक्रिया होण्यापूर्वीचा हा संवाद अनेकांना भावनाविवश करुन गेला. कार्यकर्त्यांचे प्रेम आणि दाखवलेली आपुलकी एन. डी. पाटील नामक ‘पहाडा’लाही अस्वस्थ करुन गेली. प्रत्येक कार्यकर्त्याला आधार देतच त्यांनी सांगितले. ‘कोणी मुंबईला यायची गरज नाही. अरे… मला काही होत नाही. घाबरु नका. लवकर परत येतोय. आता सुरु असलेली आणि अपूर्ण राहिलेली आंदोलने आणखी जोमाने पुढे न्यायची आहेत,’ असे सांगतच सर थोडावेळ भावनाविवश झाले होते.
शेतकरी कामगार पक्षाचे संस्थापक सदस्य आणि विधान परिषेदेचे विरोधी पक्षनेते विठ्ठलराव हांडे यांचे निधन झाले. काही दैनिकांनी ही बातमी थोडी उशिरा छापली तर काही ठिकाणी आलीच नाही. काही दिवसांनी हांडे यांच्याविषयी प्रतिक्रिया देण्याविषयी विचारणा केली तर सर प्रचंड असे संतापले. ‘अरे… आता फोन करतोस. काय चाललेय रे. महाराष्ट्रातील एक तत्कालीन विरोधी पक्षनेता आपल्यातून निघून जातो आणि तुम्ही बातम्यांतूनसुध्दा त्यांना दुर्लक्षित करता..?. हा माणूस किती मोठा होता. याची कल्पना तुला नाही. त्यांच्या अनुषंगाने प्रतिक्रिया देणार नाही. अजिबात काही छापू नको,’ असे रागाच्या भरातच बोलले. वारंवार विनंती केल्यानंतरही त्यांनी प्रतिक्रिया काही दिली नाही.
नैतिकतेच्या सर्वच पातळीवर सर सर्वोच्च स्थानी आहेत. तोच वारसा त्यांची दोन्ही मुले सुहास आणि प्रशांत यांनी जपला असल्याचे अनेकदा त्यांच्या समवेत असणाऱ्या कार्यकर्त्यांकडून ऐकला होता. त्याचे असे झाले होते की, तत्कालीन मंत्री एन. डी. पाटील सरांची मुले अथवा शरद पवारांचे भाचे म्हणून सुहास आणि प्रशांत यांच्यासाठी कोणत्याही महाविद्यालयात अथवा कोणत्याही अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणे काही अवघड नव्हते. तरीही त्यांनी कोणत्याही लाभांचा फायदा घेतला नाही.
सुहास नागपूरमध्ये वसतिगृहात राहून अभियांत्रिकी शिक्षण घेत असताना घडलेला किस्सा तर भन्नाटच होता. विधिमंडळाचे नागपूर अधिवेशन सुरु होते. एन. डी. सरांच्याबरोबर पत्नी सरोज उर्फ माई होत्या. ‘आपण नागपूरमध्ये आहे तर मुलगा सुहासला भेटूया,’ अशी विनंती सरांना केली. सरांनीही अधिवेशन सुरु होण्यापूर्वी आपण जावू, असे सांगितले. अभियांत्रिकी वसतिगृहातील मुलांची सकाळी – सकाळी गडबड सुरु असतानाच लाल दिव्याच्या गाड्या वसतिगृहात शिरल्या. पोलीस उतरल्यानंतर येथील कर्मचारी, विद्यार्थी घाबरुन गेले. प्राचार्य, रेक्टर धावतच आले. गाडीतून एन. डी. पाटील, सरोज उर्फ माई उतरल्यानंतर प्राचार्य, रेक्टर आणखी घाबरले. ‘सर.. तुम्ही कसे काय इकडे. आमच्या वसतिगृहातील मुलांनी काही गडबड केली का..?,’ अशी विचारणा केली. ‘नाही हो. मी माझ्या मुलाला भेटायला आलो आहे,’ असे सरांनी सांगताच कोणाचाही विश्वास बसला नाही. ‘तुमचा मूलगा येथे आणि आम्हाला माहीत नाही. आमच्या लक्षात तरी हे कसे आले नाही,’ अशी विचारणा रेक्टरने केली. कारण सर आणि रेक्टर एकमेकांना ओळखत होते. सरांनी कधी रेक्टरलाही सांगितले नव्हते की ‘सुहास माझा मुलगा आहे, त्याच्यावर लक्ष ठेवा’. मात्र, खरी गंमत पुढे होती. सरांची देशभरातील ओळख ‘एन. डी. पाटील’ अशीच आहे. त्यांचे ‘नारायण ज्ञानदेव पाटील’ हे नाव अनेकांना माहित नाही. परिणामी मुलाची नोंद ‘सुहास नारायण पाटील’ अशीच कॉलेज आणि वसतिगृहाच्या रजिस्टरवर होती. सुहास यांनीही आपली ओळख एन. डी. पाटील यांचा मुलगा अथवा शरद पवार यांचा भाचा अशी सांगितली नव्हती. जो वारसा सरांनी जोपासला तोच त्यांच्या मुलांनीही जपला होता. विशेष म्हणजे याच वसतिगृहात आणि अभियांत्रिकी महाविद्यालयातील रॅगिंग सुहास यांनी मोडीत काढली होती. ‘जैसा बाप… वैसा बेटा..!’ असेच हे चित्र होते.
आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था असणाऱ्या ‘रयत’मध्ये सलग अठरा वर्षे चेअरमन असल्यामुळे ते आता पुन्हा या पदावर नकोत म्हणून एक गट ‘ॲक्टिव्ह’ झाला होता. परखड आणि करारी बाण्याचे सर अनेकांना नको होते. त्यामुळे त्यांच्याविरोधातील पेरणी नित्याचीच झाली होती. मात्र, त्यांनी स्वत:हून बाजूला होण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने त्यांनी संस्थेशी पत्रव्यव्हारही केला होता.
‘रयत’मध्ये कार्यरत असताना शरद पवार, अजित पवारही त्यांना वचकून राहिले. पतंगराव कदम तर ‘आमचे एन. डी. सोडले तर मी कोणाला फारसा संस्थेत घाबरत नाही,’ असे सांगायचे. त्यांच्यामुळे ‘रयत’मध्ये एक स्वतंत्र आचारसंहिता आणली गेली. मात्र, चेअरमनपदाच्या नंतरच्या काळात त्यांच्याच माणसांना त्रास देण्याची कार्यपध्दती राबविली गेली. त्या मानणारे काही शिक्षक, प्राध्यापकांच्या अडचणींच्या ठिकाणी बदल्या केल्या गेल्या. आजही हे प्रकार सुरु आहेत. दोन वर्षांपूर्वी तर कर्मवीर अभिवादन सोहळा सभामंचकावरच अघटित घडले आणि उपस्थित हजारोंच्या काळजाचा थरकाप उडाला. सत्कार स्वीकारत असतानाच सर सभामंचकावर पडले. माझ्या नजरेतून सरांच्या आयुष्यातील सर्वात धक्कादायक असा हा प्रसंग होता.
वंचितांचे प्रश्न सोडविताना, त्यांच्यासाठी लढा उभारताना आपल्या जीवाचीही पर्वा न करणारे एन. डी. पाटील सर कितीही संकटे आली तरी मागे हटले नाहीत. वयाच्या विशीपासून सुरु झालेला हा संघर्ष अजूनही सुरु आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत कायम ठेवणार, असे सांगणारे सर देशभरातील अनेक सामाजिक चळवळींचा अभिमान आणि गौरव आहेत. ‘एन.डी.’ सर नाव सोप पण व्यक्ती समजायला फार अवघड अन् कठीण. वंचितांविषयी नेहमीच सहानुभूती बाळगणारे सर कधी करारी, कधी हळवे, कनवाळू झालेले अनेकदा पाहिले.
प्रत्यक्ष व्यक्ती म्हणून त्यांना समजून घेणे, ते ज्याप्रकारे विषयांची मांडणी करायची ते समजून घेणे माझ्यासाठी फक्त अवघडच नव्हते तर महाअवघड होते. सरांचा ९० वर्षांचा प्रवास मांडणे एवढे सोपे नाही. त्यांना शब्दात मांडणे इतके सोपे नाही. आयुष्यभर आशावादी राहिलेल्या या ‘हिमालया’ला वाढदिनी लाख-लाख शुभेच्छा..!
(लेखासोबतचे रेखाचित्र अशोक जाधव यांचे)
अप्रतिम लेख… चळवळी संपत असताना, अशा उंच व्यक्तिमत्तवाला सलाम.. !
N. D sir is always great person in politics Happy birthday sir
थोरांच जीवन दर्शन प्रेरणा देत. खुप छान लेख . येथे कर माझे जुळती.